Ad will apear here
Next
आंग्लमुनी विल्यम शेक्सपिअर
विल्यम शेक्सपिअरइंग्लंडचा महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर याचा जन्म व मृत्यूचा दिनांक २३ एप्रिल हाच आहे. जागतिक पुस्तक दिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने, ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी ‘किमया’ सदरातून शेक्सपिअरला वाहिलेली ही आदरांजली... 
..............
हजारो वर्षे जगाच्या रंगभूमीवर वावरणाऱ्या अगणित पात्रांपैकी काही जण अजरामर ठरतात. त्यातीलच एक म्हणजे इंग्लंडचा श्रेष्ठ नाटककार विल्यम शेक्सपिअर. त्याच्याविषयी अनेक कथा-दंतकथा निर्माण झालेल्या आहेत. २३ एप्रिल १५६४ रोजी जन्म आणि २३ एप्रिल १६१६ रोजी मृत्यू असा त्याचा अवघ्या ५२ वर्षांचा जीवनपट. स्ट्रॅटफोर्ड- अपॉन-एव्हन (वॉरविकशायर) हे त्याचे जन्मस्थळ आणि त्याने अखेरचा श्वास घेतला त्याच गावात; पण स्वतःच्या मोठ्या घरात. कवी, नाटककार आणि नाट्यकलाकार म्हणून त्याची कारकीर्द विलक्षण गाजली. आपल्याच गावातील ‘चर्च ऑफ दी होली ट्रिनिटी’ येथे तो चिरविश्रांती घेत आहे. त्याच्या मृत्यूनंतर २०० वर्षांनी काही संशोधकांनी अशी शक्यता वर्तवली, की त्याच्या नावावर असलेली नाटके अन्य कोणी प्रसिद्धीपराङ्मुख विद्वान लेखकांनी लिहिली होती. त्यावर अजूनही वादविवाद सुरू आहेत.

१८व्या वर्षी शेक्सपिअरने २६ वर्षीय अॅन हॅथवे नामक तरुणीशी लग्न केले. त्या वेळी ती गरोदर होती. त्यानंतर सहा महिन्यांनी तिला सुझाना नावाची मुलगी झाली. पुढे १५८५मध्ये दोघांना हॅम्नेट नावाचा मुलगा आणि ज्युडिथ ही मुलगी अशी जुळी मुले झाली. सुझाना, हॅम्नेट व ज्युडिथ एकूण तीन अपत्ये. पुढे विल्यम लंडनला आला. १५९२पर्यंत तो एक कलाकार आणि नाटककार म्हणून स्थिरावला - मान्यता पावला. इंग्लंडमधील तो सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा काळ होता. तो कालखंड ‘एलिझाबेथ’ आणि ‘जेकवियन’ या नावाने ओळखला जातो. कला, वाङ्मय, व्यापार या सर्वच क्षेत्रांतील तो सुवर्णकाळ ठरला.

शेक्सपिअरने सुमारे ३९ नाटके, १५४ सुनीते आणि दोन प्रदीर्घ काव्ये लिहिली. जगातील सर्व भाषांमध्ये त्याच्या नाटकांचे अनुवाद झालेले आहेत आणि अन्य कोणत्याही लेखकापेक्षा त्याचे नाट्यप्रयोग विक्रमी संख्येने सादर झालेले आहेत. एक अभिनेता आणि नाटककार म्हणून लंडनमध्ये १५८५ ते १५९२ यादरम्यान त्याची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. ‘लॉर्ड चेंबरलेन्स मेन’ या नावाने चालणाऱ्या नाटक कंपनीत त्याची भागीदारी होती. त्याचेच नाव पुढे ‘किंग्ज मेन’ असे झाले. त्याच्या हयातीत काढलेले त्याचे (पेंटिंग वा अन्य) चित्र उपलब्ध नाही. तो गेल्यानंतर त्याचे व्यक्तिचित्र रेखाटण्यात आले. तेच आज आपण अधिकृत मानतो. 

‘शेक्सपिअर इन लव्ह’ चित्रपटातील एक दृश्य१५८९ ते १६१३ या काळात त्याने स्वतःच आपल्या नाटकांची निर्मिती केली. त्याची विनोदी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटके श्रेष्ठ दर्जाची मानली जातात. हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर आणि मॅक्बेथ ही दुःखान्त नाटके त्याच्या उत्तर काळातील आहेत. त्यातील काव्यमय भाषा आणि भावना यांना जगात तोड नाही. तो जिवंत असताना त्यातील काही नाटके विविध स्वरूपात प्रसिद्ध झाली. १६२३मध्ये त्याच्या दोन मित्रांनी (जे त्याचे सहकलाकारही होते) शेक्सपिअरची (दोन वगळता) सर्व नाटके ‘फर्स्ट फोलिओ’ खंडातून एकत्रितपणे प्रसिद्ध केली. त्यानंतर विल्यमला ‘न भूतो न भविष्यति’ अशी प्रसिद्धी प्राप्त झाली. त्याच्या साहित्यकृतींचे पुढे वारंवार अनुकरण, रूपांतर, संशोधन आणि प्रयोग होत राहिले. त्यावर अनेक चित्रपटही निघाले आणि अजूनही तयार होत आहेत. त्यांची मोहिनीच विलक्षण आहे. 

सन १५९९मध्ये शेक्सपिअरच्या कंपनीने थेम्स नदीजवळ ‘ग्लोब’ नावाचे नाट्यगृह बांधले. १६०८ साली ‘ब्लॅक फ्रायर्स’ नावाचे दुसरे एक थिएटर त्यांनी विकत घेतले. एव्हाना तो एवढा श्रीमंत झाला, की १५९७मध्ये आपल्या जन्मगावी त्याने एक प्रचंड मोठे घर विकत घेतले. अन्यत्रही काही गुंतवणूक त्याने केली. तो स्वतःच्या आणि अन्य नाटकांमधूनही भूमिका करत असे. कालांतराने कलाकार म्हणून त्याचा रंगभूमीवरील वावर कमी होणे क्रमप्राप्त होते. जाणकारांच्या मते, त्याच्या नाटकांमधील काही दुय्यम भूमिकांसह ‘हॅम्लेट’च्या बापाच्या भुताचे कामही त्याने केले होते. लंडन आणि स्ट्रॅटफोर्ड या दोन्ही ठिकाणी त्याचे वास्तव्य असे. मृत्यूच्या काही काळ आधी त्याने कामातून पूर्ण निवृत्ती स्वीकारली. लंडनला त्याची अधूनमधून चक्कर मात्र होत असे. जगाच्या रंगभूमीचा निरोप घेण्यापूर्वी त्याने मृत्युपत्राद्वारे आपली प्रचंड मालमत्ता, पत्नी आणि दोन मुलींच्या नावे केली होती. (त्याचा मुलगा १५९६मध्येच वयाच्या ११व्या वर्षी अज्ञात आजारामुळे मरण पावला होता.)

शेक्सपिअरच्या नावाने जगभर असंख्य स्मृतिस्थळे आणि त्याचे अनेक पुतळे उभारलेले आहेत. त्याचे स्ट्रॅटफोर्डमधील घर हा इंग्लंडचा अभिमानास्पद वारसा आणि पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. 

शेक्सपिअरची गाजलेली नाटके :
हॅम्लेट, मॅक्बेथ, ऑथेल्लो, दी टेम्पेस्ट, ज्युलियस सीझर, रोमिओ अँड ज्युलिएट, किंग लिअर, रिचर्ड, दी मर्चंट ऑफ व्हेनिस, अॅज यू लाइक इट, हेन्री ५, दी टेमिंग ऑफ दी श्रू, अँटनी अँड क्लिओपात्रा, हेन्री ६, दी कॉमेडी ऑफ एरर्स, लव्ह्ज लेबर लॉस्ट, किंग जॉन, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, मेझर फॉर मेझर, विंटर्स टेल, मेरी वाइव्ह्ज ऑफ व्हेनिस, मिडसमर नाइट्स ड्रीम, पेरिक्लस, टायमन ऑफ अथेन्स, इत्यादी शेक्सपिअरची गाजलेली नाटके आहेत. त्याशिवाय १००हून अधिक सुनीते (सॉनेट्स) आणि दीर्घ कविता आहेतच. 

मराठीत आलेला ‘शेक्सपिअर’ 
पाश्चात्य नाटकांचे मराठीत रूपांतर किंवा अनुवाद ही जुनी परंपरा आहे. शेक्सपिअरच्या एकूण नाटकांपैकी सुमारे २७-२८ नाटके मराठीत आलेली आहेत. ‘मेझर फॉर मेझर’ या त्याच्या नाटकाने ह. ना. आपट्यांनी ‘सुमतिविजय’ या नावाने रूपांतर केले होते. वसंत कानेटकरांचे ‘गगनभेदी’ हे नाटक शेक्सपिअरच्या अनेक नाटकांवरून बेतलेले आहे. ‘हॅम्लेट’वर गोपाळ गणेश आगरकरांनी ‘विकारविलसित’ हे नाटक लिहिले. गणपतराव जोशी यांची त्यात प्रमुख भूमिका होती. या नाटकाची इतरांनीही मराठीत रूपांतरे केलेली आहेत. गोविंद बल्लाळ देवलांनी ‘ऑथेल्लो’चा ‘झुंझारराव’ केला. वि. वा. शिरवाडकरांनीही ‘ऑथेल्लो’ लिहिले. प्र. के. अत्र्यांनी ‘किंग लिअर’वर ‘सम्राट सिंह’ लिहिले. विंदा करंदीकरांचेही ‘राजा लिअर’ रंगभूमीवर आले. वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ तर विलक्षण लोकप्रिय ठरले. श्रीराम लागूंपासून अनेक ज्येष्ठ कलाकारांनी त्यात प्रमुख भूमिका केलेली आहे. मंगेश पाडगावकरांनी ‘ज्युलियस सीझर’चा अनुवाद केला आहे. ‘मॅक्बेथ’ची तीन रूपांतरे झालेली आहेत. 

‘कॉमेडी ऑफ एरर्स’वरून गुलझारनी बनवलेला ‘अंगूर’ हा हिंदी चित्रपट (संजीवकुमार आणि देवेन वर्मा अभिनित) खूपच गाजला. वि. सी. गुर्जरांनी ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’चे ‘संगीत प्रणयमुद्रा’ बनवले. गणेश ढवळीकर यांनी १९५५मध्ये शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणली. शेक्सपिअरच्या नाट्यकथा या नावाने अलीकडेच त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच्यावरील लेख आणि चरित्रे असंख्य आहेत. त्या सर्वांची येथे दखल घेणे शक्य नाही.

रवींद्र गुर्जर
विल्सम शेक्सपिअर हा द्विसहस्रकातील एक सर्वश्रेष्ठ नाटककार आहे. जगभरातील लेखकांना त्याच्यापासून अखंड प्रेरणा मिळत राहील. त्याच्या मृत्यूला आज (२३ एप्रिल २०२०) ४०४ वर्षे पूर्ण झाली. त्याच्या दिव्य प्रतिभेला शतदा वंदन! 

(शेक्सपिअरची मूळ पुस्तके, अनुवादित साहित्य, तसेच ई-बुक्स ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी https://goo.gl/b5guBC येथे क्लिक करा. शेक्सपिअरच्या ई-बुक स्वरूपातील साहित्य खरेदीसाठी येथे क्लिक करा. )

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZPWCL
 ग्रेट माणूस . नाटक, सिनेमा आणि सिरियल्स मधून ठायी ठायी ठायी दिसणारा एकमेव !
 अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण माहिती. "लिहीते रहो."1
 उपयुक्त माहिती तर मिळालीच. शिवाय सर्व पुस्तकांची नावेपण मिळाली.1
 Kharangna mo Tara Ravi di warhead post 442106
Similar Posts
‘माझे जीवनगाणे’ ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र वसंत गुर्जर यांनी आज (२९ एप्रिल २०१८) ७३व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने त्यांच्या ‘किमया’ सदरात त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
अलौकिक बुद्धिमत्ता असलेली सौंदर्यवती - हेडी लमार हॉलिवूडमधील अलौकिक बुद्धिमत्ता असलेली सौंदर्यवती अभिनेत्री म्हणजे हेडी लमार. अभिनयासोबतच तिने एक अत्यंत महत्त्वाचा असा वैज्ञानिक शोधही लावला होता. एके काळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीला नंतरच्या काळात विपन्नावस्थेत राहावे लागले. ही अभिनेत्री म्हणजे एक वेगळेच रसायन होते. नऊ नोव्हेंबर हा तिचा जन्मदिन
रसिकांच्या हृदयातील ध्रुवतारा - मोहम्मद रफी रसिकांच्या हृदयातील ध्रुवतारा असं ज्यांचं वर्णन करता येईल, त्या मोहम्मद रफी यांचा २४ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज लिहीत आहेत मोहम्मद रफी यांच्याबद्दल...
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language